कोरोना संसर्ग ओसरताच वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:38+5:302021-06-22T04:23:38+5:30
सध्या बाजार परिसरात मोठी गर्दी दिसून येत आहे. आठवडी बाजार बंद असून सुध्दा व्यापाऱ्यांनी रस्त्यावर, गल्ली बोळात दुकाने थाटून ...
सध्या बाजार परिसरात मोठी गर्दी दिसून येत आहे. आठवडी बाजार बंद असून सुध्दा व्यापाऱ्यांनी रस्त्यावर, गल्ली बोळात दुकाने थाटून पर्यायी बाजार भरवल्याचे निदर्शनास येत होते. सध्या लोणार कोविड सेंटरला आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यात प्रथमच रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा श्वास घेतला आहे. आजची गर्दी बघता पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिक कोरोना नियमावली धुडकावत असून यामुळेच पुन्हा एकदा कोरोना डोकेवर काढण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक कोविड केंद्राच्या वतीने कोरोना चाचणी करण्यासाठी दररोज स्थानिक बसस्थानकात शिबिर लावले जाते. गावात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांची तपासणी करणे अपेक्षित असताना नागरिक मात्र या पथकातील व नगरपरिषदच्या पथकातील सदस्यांना दाद देत नाहीत. कोरोना चाचणी करण्यास प्रतिसाद देत नसल्याने तपासण्या वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
कोरोना वाढण्याची भीती
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या तसेच कोरोना नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. अन्यथा तालुक्यात कोरोना रुग्णवाढीला पोषक वातावरण तयार होत असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे.
नागरिकांनी नियमितपणे आपली कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू.
डॉ. किसन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी.
आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या ६०० वरून २० पर्यंत खाली आली आहे. आता जनतेने सहकार्य करणे अपेक्षित आहे.
डॉ. भास्कर मापारी, व्यवस्थापक कोविड केंद्र, लोणार.