जात प्रमाणपत्रासाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये गर्दी; ना मास्क, ना अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:59+5:302020-12-27T04:25:59+5:30
गेल्या सहा दिवसांत दोन हजार जणांनी अर्ज केले असून, अर्ज करणाऱ्यांपैकी ९९ टक्के व्यक्ती या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने ही ...
गेल्या सहा दिवसांत दोन हजार जणांनी अर्ज केले असून, अर्ज करणाऱ्यांपैकी ९९ टक्के व्यक्ती या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने ही जात प्रमाणपत्राची पडताळणी व जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहे. अवघा एक टक्के जणामध्ये सीईटी परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहे. अर्ज करणाऱ्यांना लगोलग जात प्रमाणपत्र देण्यात येत नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एक वर्षाने संबंधितांना हे जात प्रमाणपत्र देण्यात येते. सध्या केवळ प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पोच उमेदवारांना त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागत आहे.
३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय भवनामध्ये मोठी गर्दी झाली आहे. वाढती गर्दी पाहता तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने दोन काऊंटर येथे सुरू केले आहेत. तसेच शारीरिक अंतर पाळण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र अनेक जण या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी
जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. १८ डिसेंबर रोजी ७० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सीईटी परीक्षेच्या संदर्भाने विद्यार्थी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
कागदपत्रांसाठी धावपळ
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लढवू इच्छिणारे कागदपत्रांसाठी धावपळ करत आहेत. निर्गमन उतारा, कोतवाल बुक नक्कल, प्रतिज्ञापत्र यासह अन्य कागदपत्रांसाठी सध्या इच्छुक चांगलीच धावपळ करत आहेत. आम्ही संग्रामपूर तालुक्यात आलो असल्याचे पातुर्डा येथील गजानन घाटाळेंनी सांगितले.
प्रशासनातर्फे दक्षता
गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने दोन काऊंटर सुरू केले आहेत. तीन सुरक्षा गार्डही येथे लावण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येऊन सुटीच्या दिवशीही कामकाज करण्यात येत आहे.
६०० पेक्षा अधिक अर्ज
जात प्रमाणपत्रासाठी २२ डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने गर्दी वाढली असून दररोज सरासरी ६०० जणांचे अर्ज येत आहे. २६ डिसेंबर रोजी अर्जांची संख्या एक हजारांच्या टप्प्यात जाण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली. अर्ज करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अत्यंत नगण्य असल्याचे
सध्याचे चित्र आहे.
कोट
वाढती गर्दी पाहता दोन काऊंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून सूचना देण्यात आल्या असून, तीन सुरक्षा रक्षक तथा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख व मधल्या काळातील सुट्यांचा विचार करता सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आलेले आहे.
- मनोज मेरत, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जात पडताळणी समिती