भाऊबीज निमित्त बसस्थानकात तोबा गर्दी
By अनिल गवई | Published: November 14, 2023 12:17 PM2023-11-14T12:17:26+5:302023-11-14T12:19:26+5:30
नादुरूस्त बसेसही महामंडळासाठी डोके दुखी ठरत असल्याने एसटीचे अनेक शेड्युल्ड दररोजच रद्द होत असल्याचे दिसून येते.
अनिल गवई, खामगाव: दीपावली, भाऊबीज सणाच्या अनुषंगाने बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किेंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने, एसटी महामंडळाचे जादा बसेसचे नियोजन पुरते कोलमडल्याचे चित्र आहे. दरम्यान, नादुरूस्त बसेसही महामंडळासाठी डोके दुखी ठरत असल्याने एसटीचे अनेक शेड्युल्ड दररोजच रद्द होत असल्याचे दिसून येते.
दीपावली सणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. मात्र, खामगाव आगारात नादुरूस्त बसेसची संख्या अधिक आहे. दररोज कोणत्या कोणत्या मार्गावरील बस नादुरूस्त होत आहे. त्यामुळे जादा बसेसचे नियोजन करताना खामगाव आगाराची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा आहे.
प्रवाशांचे पहिले प्राधान्य एसटीलाच...
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे एसटीतील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
ऐन दिवाळीत चार बसेस नादुरूस्त
खामगाव आगारातील मार्गस्थ बसेस नादुरूस्त होण्याच्या प्रमाणात गत काही दिवसांत वाढ झाली आहे. ऐन दीवाळीत चार मार्गस्थ बसेस नादुरूस्त झाल्या. यात एक बस शिरूर आगारात असून, जालना, बुलढाणा, आणि जळगाव खांदेश येथील आगारात एक नादुरूस्त स्थितीत उभी असल्याची माहिती आहे.
पुणे शेड्युल्डचा पत्ता नाही
दीपावलीसाठी गावी आलेल्या प्रवाशांना परतीसाठी गत दोन दिवसांत एकही बस लावण्यात आलेली नाही. बसेस अभावी लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येत नसल्याचे खामगाव आगारातील सुत्रांचे म्हणणे आहे. अकोला, अमरावती, शेगाव आगाराच्या बसेस त्या त्या स्थानकातूनच भरून येत अाहेत.