कोरोना संचारबंदीत कृउबासमध्ये उसळली गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 PM2021-02-25T17:00:43+5:302021-02-25T17:01:30+5:30
Khamgaon News कोरोना संचारबंदीत गुरूवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच गर्दी उसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना संचारबंदीत गुरूवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच गर्दी उसळली. धान्य खरेदी-विक्री बाजारासह गुरांच्या बाजारातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने उपविभागीय अधिकारी आणि पोलिस पथकाने याठिकाणी धडक दिली. पालिका पथक आणि पोलीसांनी हस्तक्षेप करीत कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केलेत.
बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या कोरोना विषाणू संक्रमनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी टप्प्या-टप्प्याने संपूर्ण जिल्हात जीवनावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू केली आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णयही जिल्हाधिकाºयांनी घेतला. जिल्ह्यातील कोरोना हॉस्टस्पॉट केंद्रांची निश्चिती करीत, संबधित तालुक्यातील प्रशासकीय अधिकाºयांची बैठक घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश दिलेत. गत गुरूवारी खामगाव येथे भेट देत, खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दीची पाहणी केली. त्यानंतर खामगाव येथील बाजार समिती बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने पाहणी करून खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील शेतकºयांच्याच शेतमालाच्या खरेदी-विक्रीला संमती दिली. पंरतू, खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियमांची तसेच जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे गुरूवारी सकाळी दिसून आले.
कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यातील गर्दी नियंत्रणासाठी जिल्हाधिकाºयांनी नियमावली ठरवून दिली आहे. नियमावलीचा चुकीचा अर्थ काढीत गुरूवारी बाजार समितीत गुरांचा बाजार सुरू करण्यात आला. त्यामुळे बाजारात गर्दी उसळली. ही बाब निदर्शनास येताच बाजार समिती प्रशासनाला बाजार बंद ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले. पोलीसांच्या मदतीने बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यात आली.
- राजेंद्र जाधव