जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:37 AM2021-05-11T04:37:12+5:302021-05-11T04:37:12+5:30
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने १० मार्चच्या रात्री ८ वाजेपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये जीवनावश्यक ...
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने १० मार्चच्या रात्री ८ वाजेपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत असलेला वेळ देखील रद्द करण्यात आला आहे. तथापि पेट्रोल पंप देखील सर्वसामान्यांसाठी बंद राहणार असल्याने निर्बंध लागू होण्यापूर्वी शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी उसळली होती. शहरातील बसस्थानक, डी. पी. रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबू लॉज परिसर, सिमेंट रोड, जय स्तंभ चौक आदी परिसरात नागरिकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीसह फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. प्रामुख्याने किराणा दुकानदारांनी सकाळी ११ वाजताच दुकाने बंद केली होती. मात्र, उद्यापासून किराणा मिळणार नाही, या धास्तीने बंद दुकानांसमोर देखील नागरिक बराच वेळ थांबले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने चौकाचौकात नागरिकांना सूचना देऊन नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले. गर्दीवर नियंत्रण मिळविल्याने दुपारी १२ वाजेनंतर गर्दीने वाहणारे रस्ते ओस पडले होते.
पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा !
११ ते २० मेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याने १० मेला भल्या पहाटेपासून शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.