सुट्ट्यांमुळे लोणारात पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 10:38 AM2021-08-09T10:38:55+5:302021-08-09T10:39:03+5:30
Lonar Crater : निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांची लोणार सरोवर परिसरात गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: कोरोनामुळे असलेले निर्बंध पाहता, जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात अभावानेच पर्यटक आढळत होते. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांची लोणार सरोवर परिसरात गर्दी होत आहे.
गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन, संचारबंदीमुळे घरातच राहण्याची पाळी आलेल्या अनेकांनी आता भटकंतीला सुरुवात केली आहे. त्यामुळे लोणार सरोवराला आता पर्यटक भेट देत आहेत. खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे लोणार प्रसिद्ध आहे. त्यातच शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्ट्या आल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे पाय आपसूकच लोणार सरोवराकडे वळले आहेत. त्यातच पावसामुळे लोणार सरोवराचा परिसर हिरवाईने नटला आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक लोणारला पसंती देत आहेत. हिरवीगार वनराई, अखंड वाहणारी धार या भागाला पर्यटक पसंती देत आहेत. लगतच्या जिल्ह्यातील नागरिकही लोणारला येत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीच्याही समस्येला येथे नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.