लोणार सरोवराचे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:00 AM2020-06-14T11:00:30+5:302020-06-14T11:27:53+5:30
सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका कशा मुळे बदलला याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे.
- किशोर मापारी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराचा रंग बदलल्यामुळे आणि कोरोना संसर्गानंतर अनलॉकच्या दिशेने पावले पडत असल्याने लोणार सरोवराचे हे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटक सरोवर काढावर गर्दी करत आहे. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी येथे घेतल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सरोवराच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून लालसर गुलाबी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून पर्यटक येथे येत आहेत. सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका कशा मुळे बदलला याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे.
तीन ते चार दिवसापासून सरोवरातील पाण्याचा रंग हा बदलेला असून सरोवराच्या काठवर जावून पर्यटक सध्या सेल्फी काढण्यात मग्न आहेत.
मात्र येथील आनंद लुटतांना सुरक्षीत शारीरिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसूल, पोलिस व वन्यजीव विभागने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रसंगी नीरीचे एक पथकही येथे पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. वन्य जीवचे विभागीय वन अधिकारी यांनीही येथे शनिवारी भेट दिली.
बुलडाणा शहराच्या दक्षिण पूर्व (आग्नेय) दिशेला १०५ किमी अंतरावर उल्कापातामुळे हे सरोवर बनले आहे. राज्यातील सर्वात छोट्या पक्षी अभयारण्याचा दर्जा ही या सरोवराला दिला गेला आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील हायपर व्हेलॉसिटी मेटीयोराईट इम्पॅक्टने तयार झालेले जगातील तिसºया क्रमांकाचे खाºया पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४६४.६३ मीटर असून खोली १५० मीटर आहे. त्याचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास १,७८७ मीटर तर उत्तर-दक्षीण व्यास १,८७५ मीटर आहे. येथील पुरातन मंदिरामधील ब्रिक्सचे (विटा) आयुर्मानही जवळपास दहा हजार वर्षाचे असल्याचे सांगितले जाते.