चंद्रकांत भाकरे अमर रहे! पातुर्ड्यात शहीद जवानाला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:48 AM2020-04-20T11:48:57+5:302020-04-20T11:56:11+5:30
चंद्रकांत भाकरे यांच्यासह तीन जवान काश्मिरमधील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते.
पातुर्डा ता. संग्रामपूर - काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले येथील सीआरपीएफ जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल डिस्टंन्सिंग पाळत उपस्थित नागरिकांनी आपल्या लाडक्या जवानाला ‘चंद्रकांत भाकरे अमर रहे.. ! च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला.
१८ एप्रिल रोजी चंद्रकांत भाकरे यांच्यासह तीन जवान काश्मिरमधील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. २० एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता पातुर्डा येथे गावातून मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम पोलिसांची व्हॅन यानंतर फुलांनी सजवलेल्या रथात शहीद जवान चंद्रकांत यांचे पार्थिव. यानंतर पुन्हा मागे सॅनिटायझेशन स्प्रे व सुरक्षा व्हॅन. यानंतर पाच पावले चालणारे नागरिक अशाप्रकारे आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपल्या अंगणातून, गच्चीवरून आपल्या लाडक्या जवानावर पृष्पवृष्टी करत अखेरचे दर्शन घेतले. पातुर्डा ग्रामपंचायतने तीन क्विंटल फुलांच्या पाकळ्या घरोघरी पोहचवल्या होत्या. घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही त्यास प्रतिसाद दिला. पातुर्डा फाट्यालगत भूषण रोठे यांच्या शेतात शहीद जवान चंद्रकांतच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासन, प्रशासन, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस, महसूल प्रशासन व पंचायत राज प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.