सिलिंडरचे दर वाढले, मग काय झाले, बायोगॅसवर शिजतोय स्वयंपाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:44+5:302021-09-18T04:37:44+5:30
स्वयंपाकासाठीही बायोगॅसचा वापर करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात आता बायोगॅसचा प्रयोग रुजण्यास सुरुवात झाली आहे. घरोघरी गॅस सिलिंडरचा ...
स्वयंपाकासाठीही बायोगॅसचा वापर करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात आता बायोगॅसचा प्रयोग रुजण्यास सुरुवात झाली आहे. घरोघरी गॅस सिलिंडरचा वापर सुरू झाल्यापासून चुलीवरचा स्वयंपाकच बंद झाला आहे. परंतु गॅसचे वाढलेले दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे अनेकांनी आता बायोगॅसचा प्रयोग राबविणे सुरू केले आहे.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतोय बायोगॅस
किनगाव राजा : घरगुती स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या इंधनाच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे प्रत्येकालाच सतत आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारने जवळपास १०० टक्के अनुदान असलेल्या बायोगॅस (जैववायू) च्या निर्मितीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या योजनेला किनगावराजा येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रीधरराव घिके यांनी आपल्या घराजवळील जागेत बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करून गॅस दरवाढीला एक पर्याय निर्माण केला आहे.
घिके यांच्याकडे गायी, म्हशी मिळून एकूण २० जनावरे आहेत. बायोगॅसच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असलेले शेण जनावराद्वारे उपलब्ध झाल्यामुळे तलाठी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरापूर्वी बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. सुरुवातीस बायोगॅसच्या संयंत्रात चिंचेचा पाला, चक्कीतील खराब झालेले पीठ टँकमध्ये सडवा म्हणून वापरले. त्यानंतर दररोज ५० किलो शेण व ५० लीटर पाणी वापरून गॅस निर्मितीस प्रारंभ केला. सध्या दररोज २ किलो गॅसची निर्मिती होत असून सुरुवातीस २१ दिवसांत गॅसचा सिलिंडर संपत होता, तोच आता ३५ दिवस चालत असल्याचे घिके यांनी सांगितले.
सेंद्रिय खताची निर्मिती...
गॅसनिर्मितीनंतर संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या शेणाच्या रबडीपासून दर्जेदार अशा सेंद्रिय खताची निर्मिती होत असून एका वर्षात जवळपास ८ ट्रॉली उच्चतम खत मिळते. शेतात नांगरणी करण्याच्या अगोदर शेणखत पसरवून नांगरणी करून खत व्यवस्थित मिसळल्याने उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे घिके यांनी सांगितले. पूर्वी १७ एकर जमिनीसाठी जवळपास २ लाख रुपयांचे रासायनिक खत घ्यावे लागत होते. आता फक्त १६ ते १७ हजार रुपयांचेच रासायनिक खत त्यांना घ्यावे लागते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस कायम वाढत असून शेतातील अनावश्यक तण नष्ट झाल्याची माहिती घिके यांनी दिली.
३५ हजार रुपये खर्च, २१ हजार अनुदान
किनगाव राजा येथील प्रकल्पाला बायोगॅसच्या निर्मितीसाठी सुमारे ३५ हजार रुपयांचा खर्च साधारणता येतो. त्यावर २१ हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचेही घिके यांनी सांगितले. येथील बायोगॅसच्या प्रकल्पास सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूनगत, विस्तार अधिकारी दराडे, पटवारी आढाव यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.