पोलिस गॅस गोडाऊनमधील सिलिंडर चोरणारे अटकेत
By भगवान वानखेडे | Published: April 5, 2023 03:10 PM2023-04-05T15:10:17+5:302023-04-05T15:10:33+5:30
दोन लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त : शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई
भगवान वानखेडे, बुलढाणा : पोलिस गॅस गोडाऊनमधील ३० सिलिंडर चोरणाऱ्या चार जणांना शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या सहा तासातच अटक केली. आरोपींकडून २ लाख १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
पोलिस विभागाला गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या पोलिस मुख्यालया मागील पोलिस गॅस गोडावूनमधील ३० गॅस सिलिंडरवर ४ एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते.
याप्रकरणी कल्याण शाखेत कार्यरत असलेले आत्माराम नामदेव जाधव यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ५ एप्रिल रोजी डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच संशयित आरोपी दामोदर तोताराम गायकवाड (४५,भीमनगर) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार सुनील संजय काळे उर्फ लेमन, नामदेव आनंदा खिल्लारे, दीपक सुरेश गोलांडे यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले ९९ हजार ६९० रुपयांचे ३० गॅस सिलिंडर, सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ॲपे क्रमांक एमएच-२८-ए-०१५४ असा एकुण २ लाख १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या गुन्ह्यात आणखी काही चोरट्यांचा समावेश असून, अद्याप ते फरार आहे. त्या फरारींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम सोनुने, माधव पेटकर, प्रभाकर लोखंडे, सुनील जाधव, महादेव इंगळे, गजानन जाधव, गंगेश्वर पिंपळे, युवराज शिंदे, विनोद बोरे, शिवहरी सांगळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"