दारूबंदीसाठी डफडे बजाव आंदोलन
By admin | Published: April 17, 2015 01:32 AM2015-04-17T01:32:51+5:302015-04-17T01:32:51+5:30
खामगाव एसडीओ कार्यालयासमोर पारखेडवासीयांचे धरणे; उपविभागीय अधिका-यांना दिले निवेदन.
खामगाव (जि. बुलडाणा) : गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी तसेच गावात नवीन पोलीस चौकी निर्माण करण्याकरिता पारखेड येथील ग्रामस्थांच्यावतीने गुरुवारी स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर डफडे बजाव व धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील पारखेड गावात अवैध दारूविक्री गेल्या अनेक वर्षांंंपासून सुरु आहे. यामुळे गावात साहाजिकच व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत चालले आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, याचा इतर नागरिकांनाही फटका बसत आहे. तेव्हा गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी अनेक दिवसांपासून पारखेडवासी प्रयत्नरत आहेत; मात्र गावातील अवैध दारूविक्री बंद झालीच नाही. तेव्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयासमोर पारखेड येथील नागरिकांनी धरणे आंदोलन व डफडे बजाव आंदोलन पुकारले. डफडे बजाव आंदोलनाने दिवसभर परिसर दणाणून गेला. आंदोलनाची दखल घेऊन शासनाने पारखेड येथील दारू भरारी पथकामार्फत तात्काळ बंद करावी व गावातच नवीन पोलीस चौकी निर्माण व्हावी, अशा आशयाचे निवेदन एसडीओंना दिले. सदर निवेदनावर शांताराम करंगाळे, मनोज बांगर, अविनाश देशमुख, मुकुंद चिकटे, बळीराम लांडे, अनिल देशमुख यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. दरम्यान, धरणे व डफडे बजाव आंदोलनात भारिप-बमसंचे अशोक सोनोने, अंबादास वानखडे, तर शिवसेनेचे संजय अवताडे, सुरेश वावगे, हरिभाऊ वेरूळकर, संजय लाहुडकार, कैलास फाटे यांनी पाठिंबा दिला.