गारपिटीमुळे जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:05 AM2021-02-21T05:05:43+5:302021-02-21T05:05:43+5:30

मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला अहवाल : ११४ गावांना बसला फटका बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस ...

Damage to 17,000 hectares in the district due to hail | गारपिटीमुळे जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवर नुकसान

गारपिटीमुळे जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवर नुकसान

Next

मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला अहवाल : ११४ गावांना बसला फटका

बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सहा तालुक्यांत १७,५५७ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांमार्फत मदत व पुनर्वसन विभागास सादर केला आहे. या गारपिटीमुळे सहा तालुक्यांतील ११४ गावांतील शेतीपिकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. प्रारंभी बुलडाणा तालुक्यात सकाळी संततधार पाऊस पडून अंगावर वीज पडल्याने तांदुळवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतातील सुडी झाकण्यासाठी हा वयोवृद्ध शेतकरी गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चिखली, देऊळगाव राजा, लोणार, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांसह सर्वच १३ ही तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काही भागात अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सायंकाळी मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांतही हा अवकाळी पाऊस बरसला होता.

यासंदर्भात नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली होती. सोबतच शेतकऱ्यांनाही त्यांनी काढणीस आलेले पीक योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवण्याबाबत आवाहन केले. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसानीचा आकडा कमी करण्यास मदत झाली होती.

जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यांतील एकूण ११४ गावांमध्ये शेतीपिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने प्राथमिक स्तरावर तयार केलेला हा अहवाल असून, त्यात १७,५५७ हेक्टरवर नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. या नुकसानीमध्ये उर्वरित तालुक्यांतील काही गावांचाही समावेश होऊ शकतो.

--या पिकांचे झाले नुकसान--

गहू, हरभरा, कांदा, मका, फळपिके, ज्वारी, भाजीपाला, बिजोत्पादन कांदा, द्राक्ष, डाळींब, लिंबू, भुईमूग, बाजरी या पिकांचे प्रामुख्याने नुकसान झालेले आहे. प्रसंगी यात चिखली व बुलडाणा तालुक्यांत झालेल्या नुकसानीचाही समावेश होऊ शकतो. अद्याप नुकसानीचा अहवाल अंतिम झालेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

--तालुकानिहाय नुकसान--

तालुका--बाधित गावे-- बाधित क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये)

ज. जामोद-- १६--१५४

संग्रामपूर--१०--९१

मेहकर--०३--५५

लोणार --२५--३०४५

दे. राजा --४१--९९९७

सि. राजा --१९--४२१५

एकूण--११४--१७५५७

Web Title: Damage to 17,000 hectares in the district due to hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.