अवकाळी पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:08+5:302021-03-20T04:34:08+5:30
गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमा झाले व रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. ...
गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमा झाले व रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. शेतकऱ्यांनी सोंगणीला आलेली शाळूची सोंगणी केली होती. मात्र, जमा करणे बाकी राहिली तर काही प्रमाणात आंब्याच्या झाडाला आंबे लागले होते. वादळी वाऱ्यामुळे आंबे खाली पडल्याने आर्थिक नुकसान झाली आहे. गुराढोरांकरिता शेतकऱ्यांनी वर्षभर पुरेल असे सोयाबीन, तूर, हरभरा इतर पिकांच्या भुशाची गंजी मारून ठेवले होते. त्यासुद्धा पाण्याने भिजल्या. अगोदरच यावर्षी अतिवृष्टीमुळे गवत खराब झाल्यामुळे गवताची कापणी करता आली नव्हती. त्यामुळे चाराटंचाई असल्यामुळे सर्व पिकांचे भुशाच्या गंजा मारून ठेवल्या होत्या; परंतु या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी अगोदरच खरीप हंगामात सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकांची नासाडी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. अगोदरच शेतीला लागलेला खर्च वसूल झाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गुरुवारी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.