अतिवृष्टीमुळे दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:58 AM2020-09-23T11:58:22+5:302020-09-23T11:58:36+5:30
१० हजार १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषि विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात १९ व २० सप्टेंबर रोजी झालेला पाऊस व वादळीवाऱ्यामुळे १० हजार १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषि विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच हजारो हेक्टर जमिन खरडून गेली आहे.
जिल्ह्यात गत पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मूग व उडिदाच्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे मूग व उडिदाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहे. तसेच शेंगा काळ्या पडल्या आहेत.
परिणामी शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच वादळी वाºयासाह पाऊस सतत सुरू असल्यामुळे कपाशी व सोयाबिनचेही नुकसान होत आहे. कपाशीची बोंडे गळून पडली आहेत. काही भागात कपाशीची पानेही गळून पडली आहे. त्यामुळे या पिकांचेही नुकसान होत आहे. घाटाखालील खामगाव तालुक्यात ३५७ हेक्टरवरीलसोयाबिन व कापूस पिकाचे १९ व २० सप्टेंबर रोजी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तर शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका, ज्वारी व सोयाबिनचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात ४०० हेक्टरवरील मका, उस, ज्वारी व कापसाचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात २५७३ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मलकापूर व जळगाव जामोद तालुक्यात कृषि विभागाच्या अहवालानुसार नुकसान झाले नाही. तसेच जिल्ह्यात २२१ गावांमधील शेती पावसामुळे बाधित झाली आहे.
यामध्ये सर्वाधिक नुकसान सिंदखेड राजा तालुक्यात झाले असून, ६५ गावे बाधित झाली असून, ३४१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील २९ गावे बाधित झाली असून, २५७३ हेक्टरवर नुकसान झाले आहे.