अंढेरा परिसरात वादळी पावसामुळे घरांचे नुकसान ; २५८ घरांचा सर्व्हे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 03:50 PM2018-06-03T15:50:30+5:302018-06-03T15:50:30+5:30
अंढेरा : शुक्रवारी वादळाचा तडाखा सहन करणार्या अंढेरा गावातील २५८ घरांचे नुकसान झाल्यचा प्राथमिक अंदाज आहे.
अंढेरा : शुक्रवारी वादळाचा तडाखा सहन करणार्या अंढेरा गावातील २५८ घरांचे नुकसान झाल्यचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, परिसरातील सेवानगर भागात शेतीचे जवळपा नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे हा सर्व्हे करणार्यांचे म्हणणे आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात शुक्रवारी दुपारी दोन ते चार दरम्यान जोरदार वादळी वार्यासह पाऊस पडला होता. सोबतच या भागात गारपीटही झाली होती. त्यामुळे या गावातील जुनी मोठी वृक्षे उन्मळून पडली होती तर घरांचेही मोठे नुकसान झाले होते. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराची कमानही अक्षरश: वाकली होती. गावातील एका वसतीमधील वीज रोहीत्र जमिनदोस्त झाल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. तो आजही खंडीत होता. त्यामुळे दैनंदिन कामे करताना नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सेवानगर भागात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच येथे चार नेटशेड उभारण्यात आले होते. त्यांनाही या वादळी पावसाचा फटका बसला आहे. यात संजय गायकवाड, विनोद चव्हाण आणि संतोष नामक अन्य एका शेतकर्याचे टमाटे आणि मेथीचे मोठे नुकसान झाले आहे. भाग दोनचे तलाठी सध्या या भागाचा सर्व्हे करीत आहेत. या नुकसानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. घरांचेही मोठे नुकसान अंढेरा येथे वादळी पावसाने घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तहसिलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार तलाठ्यांनी गावात नुकसानाच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले आहे. दोन जुन रोजी सायंकाळपर्यंत गावातील २०८ घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे तुर्तास सांगतायेणार नाही, असे भाग एकचे तलाठी यांनी सांगितले. आणखी एखाद दोन दिवसात सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर नुकसानाचा नेमका आकडा स्पष्ट होईल.