ब्लास्टिंगमुळे सिंचन साहित्याचे हाेतेय नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:44+5:302021-01-23T04:35:44+5:30
समृद्धी महामार्ग व शेतकरी भाग २ मेहकरः समृद्धी महामार्गासाठी हाेत असलेल्या ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याचे नुकसान हाेत आहे. ब्लास्टिंगमुळे ...
समृद्धी महामार्ग व शेतकरी भाग २
मेहकरः समृद्धी महामार्गासाठी हाेत असलेल्या ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याचे नुकसान हाेत आहे. ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड लागत असल्याने पाइपलाइन फुटत असून नाेझलचेही नुकसान हाेत आहे. त्यामुळे या महामार्गालगत शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत.
समृद्धी महामार्ग मेहकर तालुक्यातून जात असून शिवपुरी शिवारात मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. सदर काम करत असताना कंपनीकडून रस्त्यामध्ये खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत आहे.सदर ब्लास्टिंग केल्यामुळे खडक तर फोडले जात आहे;मात्र फोडलेला खडक व त्याचे छोटे छोटे दगड शेतकऱ्यांच्या शेतात असलेले तुषार सिंचनचे पाईप व नोझल फुटत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. समृद्धी महामार्गाचा रस्ता करीत असताना काही ठिकाणी हा रस्ता खूप खोल खोदण्यात येत आहे. यामुळे या रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी सुद्धा कमी होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी असलेल्या पाईपलाईन फुटल्या आहेत. सदर पाईपलाईन जोडण्याकडे सुद्धा कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यावर संक्रांत येत असल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक कोंडीत सापडले जात आहेत.
माझी शेती समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहे. या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घेत असल्याने माझ्या तुषार सिंचन पाईपचे व नोझलचे नुकसान होत आहे. सदर नुकसान कंपनीने भरून द्यावे याबाबत कंपनीकडे वारंवार मागणी केली आहे ; मात्र माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
समाधान शेषराव सुरुशे, शेतकरी, शिवपुरी
साेयाबीनच्या नुकसानीकडे दुर्लक्ष
या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खडक टाकण्यासाठी कंपनीचे वाहने रात्रंदिवस धावत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होत असून या धुळीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या सर्व्हे सुरू आहे. मात्र तो फक्त रब्बी हंगामाच्या पिके त्यामध्ये घेत असल्याने सोयाबीन या पिकांचे सुद्धा त्या नुकसान यामध्ये समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.