वसंत नगर शिवारात मका पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:20+5:302021-02-23T04:52:20+5:30
किनगाव जट्टू परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतातील काढणीला आलेले उभे पीक मका व शाळू ...
किनगाव जट्टू परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतातील काढणीला आलेले उभे पीक मका व शाळू ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरात अजूनही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हरभरा, गहू ही रब्बी हंगामाची पिके अजूनही शेतातच उभी आहेत. अगोदरच कोरोना महामारीने थैमान घातले असून, नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यात आता निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या बदलामुळे शेतातील उभी पिके धोक्यात सापडली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण झाली आहे. दरम्यान, या आठवड्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून, गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला असून, किनगाव जट्टू परिसरातसुद्धा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिसरात गहू, हरभरा, मका कांदा पिके चांगली आलेली आहेत. हे पीक सध्या काढण्याच्या मार्गावर आली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तसेच काही शेतकऱ्यांनी शेतात हरभरा पीक सोंगणी करून ठेवलेला होता. या पिकाचेसुद्धा थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतनगर शिवारातील अरुण राठोड या शेतकऱ्याचे गट नंबर १३९ मधील तीन एकर मका भुईसपाट झाला आहे. सोबतच प्रकाश राठोड यांचेसुद्धा गट नंबर १३० मधील चार एकर मका भुईसपाट झाला असल्याने शासनाने त्याची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.