वादळासह पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:29+5:302021-03-25T04:32:29+5:30
धामणगाव धाड : परिसरात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान ...
धामणगाव धाड : परिसरात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा पिकांना मोठा फटका बसला आहे.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाले असून, खरीप पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी पिकावर भिस्त होती. मात्र, त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. बदलत्या हवामानामुळे हवेत गारवा पसरल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु, याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीतीसुद्धा आहे. वादळामुळे साेंगणीसाठी आलेल्या गहू पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मका, ज्वारीचे पीकही जमीनदाेस्त झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी हाेत आहे.