बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 03:11 PM2020-04-17T15:11:07+5:302020-04-17T15:11:19+5:30
जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे
- विक्रम अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले असून मे अखेर पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी कोणत्याही भागात पाणीटंचाईची झळ मे अखेर पर्यंत जाणवणार नाही, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.
चांगला पाऊस झाल्याने धरणामध्ये मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय गतवर्षी जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी, नाले, तलाव, बंधारे, शेततळ््यात अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे अनेक गावामध्ये एप्रिल अर्धा उलटला तरी अद्याप पाणीटंचाईची झळ जाणवत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. जलसंपदा विभागानेही पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याचे दिसून येते. यामुळेच धरणातील जलसाठा किमान पावसाळ््यापर्यंत पुरेल एवढा उपलब्ध आहे. जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.