साेमठाणा येथील ग्रामसेवकाची दांडी, विकासकामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:46+5:302021-08-12T04:39:46+5:30
लोणार : तालुक्यामधील गट ग्रामपंचायत, सोमठाणा - खापरखेड येथील ग्रामसेवक अनिल राठोड हे मागील पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये ...
लोणार : तालुक्यामधील गट ग्रामपंचायत, सोमठाणा - खापरखेड येथील ग्रामसेवक अनिल राठोड हे मागील पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील अनेक कामांना खीळ बसली आहे. ग्रामसेवकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गटविकास अधिकारी, लोणार यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सरपंच अशोक चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाने दोन वर्षांपासून थैमान घातले आहे. या महामारीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना कोविडच्या संदर्भात उपायोजना करून त्या कामाचा ग्रामसेवक व सरपंच यांनी आढावा घेणे आवश्यक आहे. परंतु ग्रामसेवक राठोड हे मागील पाच महिन्यांपासून गैरहजर आहेत. मासिक सभेला हजर राहात नाहीत. घरकुलाची यादी तयार करणे, ग्रामपंचायतीचा नमुना आठ यासंदर्भातील कामे करणे, आदी कामे असूनसुद्धा ग्रामसेवक यांचा भ्रमणध्वनी सतत बंद असतो. गट ग्रामपंचायत, सोमठाणा - खापरखेड याठिकाणी कोरोना विषाणू निगडीत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामपंचायतस्तरावर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. परंतु ग्रामपंचायतीच्या मार्फत आरोग्याच्या दृष्टीने ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे सरपंचाला काम करण्यासाठी अडचण होत आहे. तेव्हा ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सरपंच अशोक चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याविषयी ग्रामसेवक राठाेड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे दाेन्ही क्रमांक बंद हाेते.
मागील पाच महिन्यांपासून ग्रामसेवक अनिल राठोड हे सतत गैरहजर आहेत. महामारीमध्ये त्यांना ग्रामपंचायत स्तरावर थांबण्याचे आदेश असतानासुद्धा ग्रामसेवक हजर राहत नाहीत. संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
-अशोक चव्हाण, सरपंच, गट ग्रामपंचायत, सोमठाणा - खापरखेड.