विद्यार्थ्यांनी शोधल्या डेंग्यूच्या अळ्या!
By Admin | Published: August 13, 2016 01:03 AM2016-08-13T01:03:34+5:302016-08-13T01:03:34+5:30
परिसर डेंग्यूमुक्त करण्याचा विद्यार्थ्यांनी केला निर्धार.
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. १२ : सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले, डबके साचल्याने मोठय़ा प्रमाणात डासांची निर्मिती होऊन अनेक व्यक्ती तापाने फणफणत आहेत. त्यामुळे परिसर डेंग्यूमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांनी घर तसेच गाव परिसरात डेंग्यू अळींचा शोध घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात यावर्षी संततधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली. त्यामुळे ग्रामीण भागासह शहर परिसरात तापाचे रुग्ण वाढले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागीलवर्षी डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे नियोजन केले होते.
या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीयाशीलतेचा उपयोग करून घेण्यासाठी १ ते १५ ऑगस्ट दरम्यान हा पंधरवडा शालेय डेंग्यू जागृती मोहीम म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून १२ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांनी डेंग्यू अळ्या शोध मोहीम आपल्या गाव परिसरात राबविली. यावेळी डेंग्यू डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी पालकांसह परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन केले.