माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:25 PM2023-01-12T12:25:13+5:302023-01-12T12:25:52+5:30
मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या.
सिंदखेड राजा शहराच्या सर्वांगिण विकासासंदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण स्वत: शहरात फिरून वास्तूंची पहाणी केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सिंदखेड राजाच्या विकासाचा डिपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची सत्ता गेली. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे. सध्याच्या सरकारला सिंदखेड राजाच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
या शहराचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत सध्याच्या युती सरकारवर टिका केली. सध्याचे ईडी सरकार विरोधकांना लक्ष करत असून सत्ताधाऱ्यांना सोडून इतरांना त्रास दिला जात आहे, असे ही खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली आहे.
या प्रश्नाला उत्तर देतांना सुळे यांनी प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्या विषयावर बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, ॲड. नाझेर काझी व स्थानिक नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उप स्थित होते.