देऊळघाटजवळ सापडले बेपत्ता युवकांचे मृतदेह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 02:55 AM2016-10-03T02:55:35+5:302016-10-03T02:55:35+5:30
नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या दोन युवकांचे मृतदेह देऊळघाटजवळ सापडले.
बुलडाणा, दि. 0२- तालुक्यातील पळसखेड परिसरात पैनगंगा नदीवर बंधार्यात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, बेपत्ता दोन्ही युवकांचे मृतदेह देऊळघाटजवळ नदीच्या पात्रात आढळून आल्यामुळे शोधकार्याला पूर्णविराम मिळाला आहे.
बुलडाणा शहरात हमालीचे काम करणारे जमील खान दुलेखान (वय ३८), ताज खान (वय ३0) दोन्ही रा. इंदिरा नगर तसेच सूर्या खरे (वय ३५) रा. जुने आरटीओ कार्यालय मागे हे तिघे शनिवारी सकाळी एका ऑटोद्वारे बुलडाणा-अजिंठा मार्गावरील पळसखेड नागो शिवारातील पैनगंगा नदीवर पोहचले. या ठिकाणी नदीत बांधलेल्या एका बंधार्यावर पोहण्यासाठी प्रथम सूर्या खरे यांनी उडी मारली; परंतु शुक्रवारी आलेल्या दमदार पावसामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहात सूर्या खरे वाहू लागला. त्याला वाचविण्यासाठी जमील खान याने नदीत उडी मारली; मात्र दोघेही पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहू लागले. या घटनेची माहिती त्यांचा तिसरा मित्र ताज खान यांनी बुलडाण्यातील नातेवाइकांना दिली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठय़ा संख्येने देऊळघाट, दत्तपूर येथील युवक त्यांना शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले; मात्र ते दोघेही मिळून आले नाही. यावेळी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, तहसीलदार दीपक बाजड, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कंकाळे आपल्या पथकासह दाखल झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता दोघांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजेदरम्यान देऊळघाटच्या पैनगंगा नदीवरील पुलाजवळ एक मृतदेह आढळला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो सूर्या खरे याचा असल्याचे दिसून आले. यावेळी थोड्या अंतरावर दुसरा जमील खान याचा मृतदेह झुडुपात अडकलेला आढळून आला. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कंकाळ यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.