गोवर-रुबेलामुळे जगात दरवर्षी सव्वा लाख व्यक्तींचा मृत्यू - डब्ल्यूएचओचे अधिकारी डॉ. मुजीब सय्यद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 06:48 PM2018-12-07T18:48:34+5:302018-12-07T18:49:11+5:30
भारतातील ४१ कोटी मुलांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे व्हॅक्सीनेशन प्रिव्हेंटेबल डिसीजेस सर्व्हीलन्स आॅफीसर डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली.
नीलेश जोशी
बुलडाणा : गोवर रुबेलामुळे जगात दरवर्षी एक लाख ३४ हजार व्यक्तींचा मृत्यू होत असून त्यातील ३६ टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होता. जागतिक आरोग्य संघटनेने दक्षीण आशियामध्ये २०२० पर्यंत गोवर निर्मूलन आणि रुबेला नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातंर्गत देशातील २१ राज्यात हे लसीकरण पूर्ण झाले असून महाराष्ट्र हे लसीकरण करणारे २२ वे राज्य आहे. दरम्यान, भारतातील ४१ कोटी मुलांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे व्हॅक्सीनेशन प्रिव्हेंटेबल डिसीजेस सर्व्हीलन्स आॅफीसर डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली. गोवर रुबेला लसीकरण ‘गैरसमज आणि तथ्य’ हा मुद्दा घेऊन बुलडाणा जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी ते दोन दिवसापासून कार्यरत आहे. शुक्रवारी (दि. ७) त्यांनी बुलडाणा कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता मोहिमेसंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रश्न : गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची गरज का?
उत्तर: गोवर रुबेला वरकरणी साधा वाटत असला तरी तो होऊन गेल्यानंतरही त्याचे दुरगामी परिणाम होता. जागतिक आरोग्य संघटनेने जगातून गोवरचे निर्मूलन आणि रुबेलाला प्रतिबंध करण्यासाठी २००९ मध्ये हालचाल सुरू केली. २०१२ च्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये २०२० पर्यंत गोवर निर्मूल आणि रुबेलाला प्रतिबंध करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यातंर्गत भारतातही ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
प्रश्न : दक्षिण आशियात किती देशात ही मोहिम राबविल्या जात आहे?
उत्तर: दक्षिण आशियातील १३ देशात ही लसीकरणाची मोहिम राबविल्या जात आहे. या १३ ही देशातून २०२० पर्यंत गोवरचे निर्मूलन व रुबेलाला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर अभ्यास करून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. भारतात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना इंजेक्शनद्वारे ही लस देण्यात येत आहे. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकंकेसह अन्य देशात ही मोहिम राबविण्यात आलेली आहे.
प्रश्न : देशात किती जणांना ही लस देण्याचे उदिष्ठ आहे?
उत्तर : भारतात ४१ कोटी मुलांना ही लस देण्याचे उदिष्ठ असून महाराष्ट्रात आतापर्यंत एक कोटी मुलांना ही लस देण्यात आली असून दक्षिणेतील राज्यामध्ये ही लस प्रारंभी देण्यात आली असून महाराष्ट्र हे २२ वे राज्य आहे. उत्तरप्रदेशमध्येही २६ नोव्हेंबर पासून ही लसीकरणाची मोहिम सुरू झाली आहे
. प्रश्न : ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनाच ही लस का देतात?
उत्तर : ही लसीकरण मोहिम राबविण्यापूर्वी जवळपास दहा वर्षे या दोन्ही आजाराचा अभ्यास करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमधूनच या आजाराचा विषणून अन्यत्र संक्रमण करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रामुख्याने याच वयोगटातील मुलांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान ९५ टक्के प्रकरणात याच वयोगटातून आजाराचे दुसर्यांमध्ये संक्रमण झाल्याचे निदर्शणास आले. त्यामुळे हे संक्रमण रोखण्यासाठी हा वयोगट टार्गेट ग्रूपमधून घेण्यात आला आहे.
प्रश्न : हा आजार किती धोकादायक आहे?
उत्तर : गोवर रुबेला वरकरणी साधे वाटत असले तरी हा आजार होऊन गेल्यानंतर जवळपास सहा वर्षानंतरही त्याच्या दृष्परिणामामुुळे मेंदूज्वर होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. महिलांचा गर्भपात होण्यासोबतच प्रसंगी अपत्य हे शारीरिक व मानसिकस्तरावर विकलांग राहू शकते. जगात दरवर्षी एक लाख ३४ हजार व्यक्तींचा मृत्यू या आजारामुळे होते. भारतात ५० हजार व्यक्ती दरवर्षी या आजारामुळे मृत्यू पावतात. लसीकरण झाले नसल्यास कंजेनायटर रुबेला सिंड्रोम अपत्यामध्ये राहू शकते. मलकापूर शहरात दोन दिवसापूर्वीच असे एक अपत्य आढळले आहे. अपत्य गतीमंद, अंध, बहिरे, ह्रदयास छिद्र, यकृत दोष आणि प्रसंगी शरीरिरात दोन लिटर रक्त साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या स्प्लीनचाही दोष जन्मणार्या अपत्यामध्ये राहू शकतो. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन आजार बळावू शकतात.
प्रश्न : गोवर रुबेलाची लस किती सुरक्षीत आहे?
उत्तर : गोवर रुबेलाची लस ही जागतिक आरोग्य संघटनेने प्री कॉलीफाईन व्हॅक्सीन म्हणून मान्यता दिलेले आहे. सिरम इंडिया इंस्टीट्यूटने ती बनवली असून भारतातच नव्हे तर अन्य देशातही गोवर रुबेलाला प्रतिबंध करण्यासाठी ती वापरण्यात येते. त्यामुळे या लसीकरणासंदर्भात निर्माण झालेल्या अफवांमध्ये तथ्य नाहीत. लसीकरण हे प्रशिक्षीत परिचारिका तथा तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येते. त्यामुळे त्याविषयीही शंका ठेवण्याचे कारण नाही. देवीच्या लसीनंतरची ही सर्वात मोठे इंजेक्शनद्वारे होणारे लसीकरण आहे.