साथीच्या आजाराने ७४ बक-यांचा मृत्यू
By Admin | Published: March 18, 2016 02:09 AM2016-03-18T02:09:02+5:302016-03-18T02:09:02+5:30
साथीच्या अज्ञात रोगाने आठ दिवसांत बकरीची ७४ पिल्लांचा मृत्यू.
कोयाळी दहातोंडे (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथे साथीच्या अज्ञात रोगाने आठ दिवसांत बकरीची ७४ पिल्लांचा मृत्यू झाला, तर १७ मार्च रोजी अज्ञात रोगाने एक गोर्हेही दगावले. आधीच यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी तसेच पशुपालक हवालदिल झाले आहेत. अशातच कोयाळी दहातोंडे येथे जनावरांवर विशेषत: बकर्यांवर अज्ञात साथ पसरली आहे. या अज्ञात साथीच्या आजाराने संजय रामकृष्ण दहातोंडे यांच्या मालकीच्या ३७ पिल्लांचा मृत्यू झाला, तर संदीप सुभाष मानवतकर यांच्या मालकीची १0 पिल्ले व एक बकरी, जनार्दन हिवरकर यांच्या मालकीची १५ पिल्ले तसेच शिवाजी अवसरमोल यांच्या मालकीच्या १२ पिल्लांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेळी पालन करणार्यांमध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. याच अज्ञात साथीने कैलास नामदेव नरवाडे यांच्या मालकीचे गोर्हे १७ मार्चला दगावले. त्यामुळे या शेतकर्यांचे जबर नुकसान झाले आहे. आजार नेमका कोणता आहे, हे अद्याप कुणाला कळले नाही. विशेष म्हणजे, गावात एकाही पशुवैद्यकीय अधिकार्याने येऊन चौकशी केली नाही. पशुपालकांचे साथीच्या आजाराने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने भरापाई मिळावी, अशी मागणी होत आहे.