कोरोनामुळे मृत्यू; २४ तासानंतर मिळाला ‘विसावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:51 AM2020-07-20T10:51:53+5:302020-07-20T10:52:24+5:30
तब्बल २४ तास अंतिम ‘विसावा’ मिळण्यासाठी ताटकलेल्या कोरोना बाधीत मृतकाच्या पार्थिवाला बुलडाण्यातील संगम तलाव स्थित स्मशानभूमीत रविवारी दुपारी चीर शांती मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दोन स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास दिलेला नकार आणि निकटच्या नातेवाईकांनी घेतलेला काढता पाय यामुळे तब्बल २४ तास अंतिम ‘विसावा’ मिळण्यासाठी ताटकलेल्या कोरोना बाधीत मृतकाच्या पार्थिवाला बुलडाण्यातील संगम तलाव स्थित स्मशानभूमीत रविवारी दुपारी चीर शांती मिळाली. मात्र या मृत्यूमुळे अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावरून दोन समाजामध्ये निर्माण झालेला वाद आणि प्रशासना समवेत झालेल्या बैठकांमध्ये काढण्यात आलेल्या तोडग्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी आणखी किती संघर्ष उभे राहतील हे प्रश्न मात्र अद्याही अनुत्तरीत आहेत.
मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्याने बुलडाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नऊ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या या ४७ वर्षीय व्यक्तीने तब्बल नऊ दिवस कोरोना विषाणूसी जिकराची झुंझ दिली. मात्र १८ जुलै रोजी उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्याच्या पार्थिवार कोठे अंत्यसंस्कार करायचे हा मुद्दा प्रदीर्घ काळ चर्चेत राहला. गावपातळीर संपर्क साधूनही अपेक्षीत निर्णय मिळू शकला नाही. त्यानंतर मोताळा येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा मुद्दा समोर आला. मात्र या मुद्द्यावरही चर्चा सुरूच राहली. मात्र निर्णय आला नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचे पार्थिव हे बुलडाणा येथील शवागारात ठेवण्यात आले होते.
परिस्थिती पाहता प्रशासनासमोरही अंत्यसंस्कार कोठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. अंत्यसंस्कारासाठी कोणी पुढे येत नसल्याने प्रशासनाने बुलडाण्यातील जोहर नगर येथील स्मशानभूमीत अंत्यंसंस्कार करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र यापूर्वी येथे अंत्यंसंस्कार करण्याच्या कारणावरून एका समाजातील नागरिक व प्रशासनात वाद आधीच विकोपाला गेला होता. जवळपास तीन कोरोना बाधीत व्यक्तींच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून येथे वाद होता. शहरात दोन स्मशानभूमी असतानाही एकाच ठिकाणी बाहेर गावातील कोरोना बाधीत मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यास जोहरनगर मधील नागरिकांचा विरोध होता. त्यावरून वादंग सुरू होते. तीन वेळा सामंजस्याने हा वाद मिटला होता. मात्र पुन्हा गुळभेली येथील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा मुद्दा समोर आल्याने जोहरनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा वाद उफाळला. शहर पोलिस ठाण्यात प्रशासन तथा उभय बाजूंच्या नागरिकांची बैठक झाली व त्यात संगम तलाव स्थिती स्मशानभूमीत गुळभेलीतील मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथेही विरोध झाला.
दोन्ही स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
जोहर नगर व संगम तलाव स्थित स्मशानभूमीत आलटून पालटून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिस ठाण्यातील बैठकीत आपसी सामंजस्याने घेण्यात आला. त्यामुळे गुळभेळी येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर संगम तलाव स्थित स्मशानभूमीमध्ये दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तुर्तास हा प्रश्न मिटला असला तरी एकंदरीत स्थितीत प्रशासनाची हतबलताही समोर आली. गंभीर बाब म्हणजे कोरोना बाधीत व्यक्तीच्या पार्थिवावर तब्बल २४ तासानंतर या सर्व प्रकारामुळे अंत्यस्कार झाले. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन नातेवाईकही नंतर अंत्यविधीस उपस्थित राहले.