महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:27 AM2021-03-17T11:27:06+5:302021-03-17T11:27:47+5:30
Death of a Gram Panchayat employee वीज खांबावर चढताच विश्वंभर मांजरे यांना विजेचा शॉक लागला आणि ते वीज खांबावरच गतप्राण झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा: येथील पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथील एका ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा वीज खांबावर काम करीत असताना मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी घडली. प्रकरणी कर्मचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. यातील एकास साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे.
मलकापूर पांग्रा येथे महावितरणे ३३ केव्हीचे एक उपकेंद्र आहे. येथून गावात व कृषी पंपासाठी वीज पुरवठा केला जातो. ३३ केव्ही लाईनवरील एका पोलवर ‘जंपर’ तुटल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानुषंगाने सकाळी १० वाजता लाईनमन प्रशांत देशमुख आणि सहाय्यक सोनपसारे हे तेथे गेले . स्वतः प्रशांत देशमुख आणि सोनपसारे यांनी परवानगी घेऊन वीज खांबावर चढून तेथे झालेला बिघाड काढण्याऐवजी ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर श्रावण मांजरे यांना बोलावून मुख्य वाहिनीवरील दोष दुर करण्यासाठी खांबावर चढविले. मात्र त्या अगोदर ३३ केव्ही वीज उपकेद्रातून तशी रितसर परवानगी घ्यावयास हवी होती. परंतू परमीट घेतले असल्याचे सांगून त्यांनी विश्वंभर मांजरे यांना खांबावर चढविले. वीज खांबावर चढताच विश्वंभर मांजरे यांना विजेचा शॉक लागला आणि ते वीज खांबावरच गतप्राण झाले. हा घटनाक्रम निदर्शनास येताच प्रशांत देशमुख व सहाय्यक सोनपसारे यांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना गावा जवळच घल्याने नागरिकांचीही तेथे मोठी गर्दी जमली होती.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा
या प्रकरणी नंदू श्रावण मांजरे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी लाईनमन प्रशांत देशमुख आणि सहाय्यक सोनपसारे यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून लाईनमन प्रशांत देशमुख यास अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे हे करीत आहेत.