राणीच्या बागेतील दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 09:59 PM2019-06-02T21:59:11+5:302019-06-02T21:59:19+5:30
राणीच्या बागेमध्ये ठेवण्यात आलेल्या दीड वर्षाच्या बिबट्याचा ३१ मे रोजी मृत्यू झाला.
बुलडाणा: येथील राणीच्या बागेमध्ये ठेवण्यात आलेल्या दीड वर्षाच्या बिबट्याचा ३१ मे रोजी मृत्यू झाला. दरम्यान विषाणूजन्य आजार, उष्माघात आणि प्रचंड ट्रेसमध्ये असलेल्या या बिबट्याचा अवघ्या काही दिवसातच मृत्यू झाल्याने संशय व्यक्त होत आहे. त्यातच मृत बिबट्या हा शेड्यूल एक मधील प्राणी असल्याने दोन दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या या प्राण्याची माहिती बाहेर न आल्यामुळे याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे. खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारामध्ये आजारी अवस्थेत काही दिवसापूर्वी हा बिबट्या सापडला होता.
त्याला तेथून वनविभागाने रेस्कूय करू बुलडाणा येथील राणीच्या बागेत ठेवले होते. या बागेलगतच जिल्हा उपवनसंरक्षक संजय माळी व त्यांचे कार्यालय आहे. बागेतील लोखंडी पिंजऱ्यात या बिबट्याला ठेवण्यात आले होते. आधीच विषाणूजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या या बिबट्याची उपासमार तथा उष्माघात आणि आजारपणामुळे आलेल्या ट्रेस यामुळे हा बिबट्या दगावला असावा अशी शक्यता पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील डॉ. व्ही. आर. मोरे यांनी दिली. या मृत बिबट्याचे शवविच्छेदन त्यांनी केले होते. मात्र बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या वर्तुळा बाहेर येण्यास जवळपास दोन दिवस लागले. त्यामुळे या विषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू हलगर्जीपणामुळे तर झाला नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
विषाणूजन्य आजार, ट्रेस व उष्माघातामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा कयास आहे.
व्ही. आर. मोरे, डॉक्टर, पशुसंवर्धन विभाग, बुलडाणा
दोन दिवसापूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अंत्रज शिवारातून त्यास आणण्यात आले होते. तो आजारी होता.
(संजय माळी, जिल्हा उपवन संरक्षक, बुलडाणा)