पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणार्या पतीचा कुटुंबीयांच्या मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:21 AM2018-02-10T01:21:50+5:302018-02-10T01:22:17+5:30
लोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीसह, आई-वडील व मेहुण्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे गुरुवारी रात्री घडली. दरम्यान, याप्रकरणी लोणार पोलिसांनी शुक्रवारी मृत व्यक्तीची पत्नी, मृतकाचे आई-वडील आणि मेहुण्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

विनोद हिंमत सानप (वय ३२) असे हाणामारीत ठार झालेल्याचे नाव आहे. लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील विनोद सानप व त्याची पत्नी रंजना यांच्यामध्ये ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मारामारी झाली. त्यानंतर पुन्हा रात्रीदरम्यान विनोद हिंमत सानप हा त्याची पत्नी रंजना सानप हिच्या चारित्र्याबाबत संशय घेत असल्याने हिंमत जिजाजी सानप, कमल हिंमत सानप, रंजना विनोद सानप, बबन विनायक गीते यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये विनोद सानप याच्या डोक्याला व पोटावर गंभीर मार लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, विनोद सानप याला लोणार ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
यासंदर्भात पोलीस पाटील इंद्रजित पिराजी चव्हाण यांनी लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून मृत विनोदचे वडील हिंमत सानप, आई कमल सानप, बबन गीते व पत्नी रंजना सानप यांच्या विरोधात लोणार पोलीस ठाण्यात अप.क्र. ५४/१८ कलम ३0२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.