श्यामल नगरातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू, नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंत्यविधीची प्रकीया थांबविली
By अनिल गवई | Published: August 24, 2023 04:05 PM2023-08-24T16:05:01+5:302023-08-24T16:05:59+5:30
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
खामगाव: येथील श्यामल नगरातील एका ४५ वर्षीय महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला. यामृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करीत नातेवाईकांनी अंत्यविधीची प्रक्रीया थांबविली. त्यामुळे श्यामल नगरात एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, श्यामल नगरातील पूजा देविदास धोटे या महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरकडील मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त करीत अंत्यविधीची प्रक्रीया थांबविली. अंत्यविधीची क्रीया थांबविण्यात आल्याने श्यामल नगरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत्यूचे कारण निष्पन्न करण्यासाठी मृतक महिलेच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. तेथे सायंकाळी महिलेच्या पार्थीवावर शवविच्छेदन करण्यात आले. आता शव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या महिलेच्या मृत्यूच्या कारणाचा तिढा सुटणार असल्याची माहिती आहे.
महिलेच्या पतीशी नातेवाईकांचा वाद
मृत्यूची माहिती समजताच महिलेचे नातेवाईक श्यामल नगरात धडकले. यावेळी मृत्यूच्या कारणाबाबत संशय बळावल्याने, महिलेच्या भावांच्या मुलांसह काही नातेवाईकांनी तिच्या पतीसोबत वाद घातला. पोलीसांनी मध्यस्ती करीत प्रकरण निस्तरले. त्यामुळे नातेवाईकांना रोष शांत झाला.
खामगाव पोलीस घटनास्थळी
महिलेच्या मृत्यूवरून तणाव निर्माण झाल्याचे समजताच शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी मृतक महिलेच्या नातेवाईकांशी चर्चा करीत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेचे पार्थीव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. महिलेच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.