विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू, वीजपुरवठा सुरळीत करताना मूर्ती गावाजवळ घडली घटना
By संदीप वानखेडे | Updated: May 17, 2024 18:37 IST2024-05-17T18:36:47+5:302024-05-17T18:37:10+5:30
ही घटना १७ मे राेजी माेताळा तालुक्यातील मूर्ती गावाजवळ घडली. गुणवंत विश्वनाथ सांगवे असे मृतक वायरमनचे नाव आहे.

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू, वीजपुरवठा सुरळीत करताना मूर्ती गावाजवळ घडली घटना
बुलढाणा : वादळामुळे तुटलेले विजेचे तार जाेडत असताना अचानक वीज प्रवाह आल्याने एका वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना १७ मे राेजी माेताळा तालुक्यातील मूर्ती गावाजवळ घडली. गुणवंत विश्वनाथ सांगवे असे मृतक वायरमनचे नाव आहे.
माेताळा तालुक्यात १६ मे राेजी वादळासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे, विजेचे अनेक खांब काेसळले, तसेच तारही तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला हाेता, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी १७ मे राेजी सकाळपासूनच वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामास प्रारंभ केला हाेता. माेताळा सर्कलमध्ये कार्यरत असलेले लाईनमन गुणवंत विश्वनाथ सांगवे हे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तार जाेडत हाेते.
यावेळी अचानक वीज प्रवाह आल्याने सांगवे यांना जबर शाॅक बसला, करंट लागल्याने ते फेकले गेले, त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वृत्त लिहिस्ताेवर पाेलिसांत नाेंद करण्यात आली नव्हती.