शारा येथील कोरोना संदिग्ध महिला रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:46 AM2020-05-26T11:46:36+5:302020-05-26T11:47:25+5:30
लोणार तालुक्यातील एका ६० वर्षी संदिग्ध महिला रुग्णाचा लोणार ग्रामीण रुग्णालयात २६ मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
शारा (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील एका ६० वर्षी संदिग्ध महिला रुग्णाचा लोणार ग्रामीण रुग्णालयात २६ मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मृत महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.
मृत महिलेचा मृतदेह सध्या लोणार ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुसरीकडे आरोग्य विभागाच्या वतीने या संदिग्ध मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरू करण्यात आले आहे. २६ मे रोजी सायंकाळ पर्यंत या सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना बुलडणा येथील आयसोलेशन कक्षामध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मृत महिलेचा जावाई हा मुंबई मंत्रालयामध्ये कार्यरत आहे. २० मे रोजी ही महिला, तिची मुलगी व लहान बाळ, जावाई हे मुंबई येथून शारा गावी पोहोचले होते. त्यामुळे त्यांना घरातच क्वारंटीन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र २२ ते २३ मे दरम्यान वृद्ध ६० वर्षीय महिलेला सर्दी, ताप, खोकला व घसा कोरडा पडण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे महिलेस रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून परत घरी आणण्यात आले होते. दरम्यान महिलेचा त्रास वाढल्याने एका खासगी डॉक्टरलाही या वृद्ध महिलेला दाखविण्यात आले होते. तिची एकंदरीत परिस्थिती पाहता खासगी डॉक्टरांनी या वृद्ध महिलेला त्वरित लोणार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती आहे. त्यामुळे लोणार येथे या आजारी वृद्ध महिलेला नेले असता तिचा २६ मे रोजी पहाटे मृत्यू झाला, अशी पुष्टी लोणार येथील आरोग्य विभागातील सुत्रांनी केली.
दरम्यान, मृत महिलेचा पतीही आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आता आरोग्य विभाग कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया पारपाडत आहे.
वैद्यकीय संकेतानुसार मृतदेहाचे अंत्यसंस्कार
मृत महिला ही कोरोना संदिग्ध रुग्ण म्हणून गणल्या गेली आहे. त्यामुळे मृत महिलेच्या पार्थिवावर वैद्यकीय संकेतानुसारच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुसरीकडे तहसिलदार सैफन नदाफ आणि नायब तहसिलदार हेमंत पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, पोलिस पाटील, गावचे सरपंच यांनीही शारा गावास भेट देवून पाहणी केली तसेच आवश्यक सर्व सुचनाही देण्यात आल्या आहेत.