डेंग्यूमुळे भानखेड गावावर मृत्यूचे सावट; १२ दिवसांत तिघे दगावले!

By ब्रह्मानंद जाधव | Published: June 16, 2023 04:02 PM2023-06-16T16:02:21+5:302023-06-16T16:18:47+5:30

अनेकांना डेंग्यूचा डंख; ७० बरे झाले, २५ जणांवर उपचार सुरू

Death toll in Bhankhed village due to dengue; Three people died in 12 days! | डेंग्यूमुळे भानखेड गावावर मृत्यूचे सावट; १२ दिवसांत तिघे दगावले!

डेंग्यूमुळे भानखेड गावावर मृत्यूचे सावट; १२ दिवसांत तिघे दगावले!

googlenewsNext

चिखली : तालुक्यातील भानखेड येथे गेल्या काही आठवड्यांपासून डेंग्यूमुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. दहा महिन्यांचा चिमुकला व चौदा वर्षीय मुलापाठोपाठ १५ जूनला पाच महिन्यांच्या गर्भवतीचा या आजाराने बळी गेला. या गावातील २५ जणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारला आहे. यापैकी अनेकांच्या चाचण्यांचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे.

शहरापासून जवळच असलेल्या भानखेडमध्ये महिनाभरापासून डेंग्यूची दहशत पसरली आहे. अवघ्या २ हजार लोकवस्तीच्या या गावात आजरोजी २५ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. ३ जूनला गावातील ओम वाघ या मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. ८ तारखेला ऋतुराज इंगळे हा दहा महिन्यांचा चिमुकलादेखील यामुळेच दगावला होता. त्या पाठोपाठ १५ जून रोजी कांचन सुनील तारू या पाच महिन्यांच्या गर्भवतीचादेखील डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रारंभी सामान्य तापाची साथ असल्याचा समज होता. मात्र, एकापाठोपाठ तीन जणांचा या आजाराने बळी गेल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. अनेक रुग्णांच्या रक्त चाचण्यांतून त्यांना डेंग्यू असल्याचे निदान झाले.

गर्भवतीच्या मृत्यूने समाजमन सुन्न
चिखली : कांचन तारू या पाच महिन्यांच्या गर्भवतीला ११ जून रोजी ताप आल्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी १४ जूनला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांना त्यांना वाचविण्यात अपयश आले. मृत कांचन तारू यांना ६ आणि ४ वर्षांच्या दोन मुली आहेत. आता त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. अवघ्या चारच दिवसांत डेंग्यूमुळे त्यांच्यासह गर्भाशयातील पाच महिन्यांचे बाळ या जगात येण्याआधीच दगावले. तथापि दोन मुली आईच्या मायेला पोरक्या झाल्या. या दुर्दैवी घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. १५ जून रोजी त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठा जनसागर उसळला होता. यावेळी अनेकांनी आरोग्य यंत्रणेसह शहरातील उपचार सुविधेवरही रोष व्यक्त केला.

आरोग्य विभागाच्या दहा चमुंद्वारे गावात सर्वेक्षण केले जात आहे. तापेच्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून घरोघरी औषधोपचार केले जात आहे. गावात पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या आहेत. त्या टाक्या खाली करणे शक्य नसल्याने त्यामध्ये टेमिफॉस औषध टाकले आहे. गावात कोरडा दिवस पाळणे, धूर फवारणी आदी उपाययोजना केल्या जात आहेत.
- डॉ. राजेंद्र सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी, चिखली.

Web Title: Death toll in Bhankhed village due to dengue; Three people died in 12 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.