खादी व ग्रामोद्योगच्या सभासदांना कर्जमाफी
By admin | Published: September 2, 2014 11:16 PM2014-09-02T23:16:59+5:302014-09-02T23:22:53+5:30
अमरावती विभागातील खादी व ग्रामोद्योगच्या १0 हजार सभासदांना १२ कोटी ५९ लाख रुपयांची कर्जमाफी.
बुलडाणा : शासनाने खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कारागिरांना रोजगार हमी योजनेतून दिलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील बलुतेदार व ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या राज्यभरातील सभासदांना सुमारे ७९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यापैकी अमरावती विभागातील १0 हजार ४७८ सभासदांना १२ कोटी ५९ लाख १७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत राज्यातील बलुतेदार, ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सभासदांना विविध ग्रामोद्योगांसाठी कारागीर योजना हमी योजनेंतर्गत वितरित केलेले कर्ज दीर्घ काळापासून थकीत आहे. त्यांना कर्जमाफी देण्यासाठी तालुकास्तरावरील एकूण ३११ बलुतेदार सहकारी संस्थांच्या सभासदांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने घेतला असून, यासंदर्भात १ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरांवरील खादी ग्रामोद्योग कार्यालयांना आदेशही जारी करण्यात आले. त्यानुसार कर्जदारांच्या खात्यातून कर्ज माफीची रक्कम वजा करणे सुरू झाले आहे. माफ केलेली थकीत रक्कम शासनाकडून जिल्हा सहकारी बँकांना उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व बँकांनी बलुतेदार, ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सभासदांच्या नावे असलेली थकीत रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याबाबत कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिल्या जाणार आहेत.
जिल्हा सभासद कर्जमाफीची रक्कम
अमरावती २६३१ २,२१,८७,२३५
अकोला ६९२ १,१0,८२,१८१
वाशिम ५९२ १,२३,८२,९८३
यवतमाळ ४३५८ ५,२८,४२,00६
बुलडाणा २२0५ २,७४,२२,६४0