चिंब पावसात बाप्पाला निरोप
By admin | Published: September 16, 2016 03:00 AM2016-09-16T03:00:22+5:302016-09-16T03:00:22+5:30
गणरायाला निरोप देताना भाविकांचा उत्साह. खामगावात रात्री उशिरापर्यंंंत मिरवणूक सुरू होती.
बुलडाणा/खामगाव, दि. १५- गेल्या दहा दिवस भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेले पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात विघ्नहर्ता गणरायाला १५ सप्टेंबर रोजी उत्साहात निरोप देण्यात आला. बुलडाणा तालुक्यात सायंकाळी जोरदार तर खामगाव तालुक्यात रिमझिम पडलेल्या पावसात गणरायाला निरोप देताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. खामगावसह काही शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंंंत मिरवणूक सुरू होती.
बुलडाणा शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली. सर्व प्रथम संगम चौकातून गणेश विसर्जनासाठी मिरवणुकीने प्रारंभ झाला. सर्वात जुन्या सुवर्ण गणेश मंडळाला मानाचा गणपती म्हणून स्थान देण्यात आले. यावेळी हतेडी येथील महिला भजनी मंडळाने सहभाग घेतला. त्यानंतर रूद्र गणेश मंडळाची मिरवणूक ढोल, ताशाच्या निनादात काढण्यात आली, तर दुपारी सरकारी बगीच्या तलाव परिसरात विसर्जनासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी बुलडाणा नगरपालिका व सामाजिक वनीकरण विभागाने निर्माल्य संकलन केंद्र उभारले होते. यावेळी पालिका व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांंंनी निर्माल्य गोळा करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी अनेक भाविक भक्तांनी आपल्या सोबत आणलेले निर्माल्य संकलन केंद्राजवळ असलेल्या कार्यकर्त्यांंंकडे जमा करीत होते, तर अनेकांनी परिसरातील विहिरीवर गणपती विसर्जन केले होते. त्यामुळे सर्वत्र गणेश भक्तांची गर्दी दिसून येत होती, तसेच खामगाव शहरात मुख्य मिरवणुकीत २६ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. कडक पोलिसांच्या बंदोबस्तात मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मलकापूर, नांदुरा येथेही शांततेत मिरवणूक पार पडली.