कृउबास संचालकपदी नियुक्तीचा न.प.चा ठराव बेकायदेशीर
By admin | Published: May 30, 2017 12:52 AM2017-05-30T00:52:39+5:302017-05-30T00:52:39+5:30
नियुक्तीच्या ठरावास आव्हान: जिल्हाधिकारी यांचा ‘जैसे थे’ चा आदेश
चिखली : नगर परिषदेने गत १६ मे रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये घेतलेला ठराव क्रमांक २ नुसार चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालकपदी स्वप्नील अरूणकुमार गुप्ता यांची नियुक्ती केली होेती़ या ठरावास जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे प्रकरण दाखल करून आव्हान देण्यात आले होते. त्यानुसार प्रकरणाची सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी सदरचा ठराव बेकायदेशीर ठरवून ‘जैसे थे’ परिस्थितीचा आदेश पारित केला आहे़. परिणामी, या ठरावावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी कोणतेही आदेश पारित केलेले नाहीत.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालकपदी नियुक्ती करण्यासाठी चिखली नगर परिषदेने १६ मे २०१७ रोजी विशेष सभेत ठराव घेऊन स्वप्नील अरूणकुमार गुप्ता यांची संचालक म्हणून नियुक्ती केली होती; परंतु महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ मधील कलम ३०८ अन्वये याप्रकरणी सभागृहातील विरोधी पक्षनेते अ.रफीक अ.कादर यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे या नियुक्तीस आव्हान देणारे प्रकरण दाखल केले होते़ त्यावर २३ मे रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे समक्ष सुनावणी घेण्यात आली़ त्यावर जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, असा आदेश पारित केला आहे़
या प्रकरणात अध्यक्ष नगर परिषद चिखली, मुख्याधिकारी नगर परिषद चिखली, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा, सचिव बाजार समिती चिखली यांना गैरअर्जदार करण्यात आले असून, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली या संस्थेवर नियुक्ती देताना कायदेशीर ठराव घेऊन नगर परिषद सदस्यांनाच सदर संस्थेवर नियुक्ती देणे कायदेशीर आहे, असे नमूद केले आहे़ त्यामुळे स्वप्नील अरूणकुमार गुप्ता यांची बाजार समिती चिखली येथे झालेली नियुक्ती तूर्तास तरी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी याप्रकरणी कोणताही आदेश पारित केलेला नाही़ अर्जदाराच्या बाजूने विधिज्ञ अॅड़ विलास नन्हई यांनी कामकाज पाहिले.