महावितरणाच्या जनता दरबारात शेकडो तक्रारींचा फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:42 PM2018-09-26T17:42:06+5:302018-09-26T17:42:24+5:30
बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकर्यांच्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला.
बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकऱ्यां च्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. तब्बल पाच तास चाललेल्या या जनता दरबारामध्ये शेतकर्यांना वेठीस धराल तर याद राखा, अशी तंबीच खा. प्रतापराव जाधव यांनी अधिकार्यांना दिली. दरम्यान, शेतकरी व जनसामान्यांच्या सुविधेसाठी महावितरण आहे. त्यामुळे अधिकार्यांनी कौटुंबिक भावनेतून काम करून समस्या एैकणारे कान ठेवा, असे सुचक विधानही अधिकार्यांना उद्देशून केले. खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालीच हा जनता दरबार झाला. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, बबनराव तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, इन्फ्राचे अधिक्षक अभियंता बोरीकर, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान, पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नाही, अधिकारी पैशाची मागणी करतात, अनधिकृत सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले, वीज भारनियमनाचा त्रास अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिक, शेतकर्यांनी केल्या. दरम्यान, उपस्थित अनेक तक्रारींचा यावेळी आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. दुसरीकडे धडक सिंचन विहीरीवरील वीज जोडणीस प्राधान्य देणयाच्या सुचनाही खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केल्या. नादुरुस्त वीज रोहीत्र त्वरेने दुरुस्त करण्याबाबतही त्यांनी सुचीत केले. पैशाची मागणी करणार्या एजंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अभियंत्यांना त्यांनी ताकीदच दिली.
१९ वर्षानंतर शेतकऱ्याला न्याय
देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथील गबाजी लक्ष्मण चेके यांनी महावितरणकडे १२ जुलै १९९९ मध्ये वीज जोडणीसाठी कोटेशन भरले होते. पैसे भरल्याचीही पावती त्यांनी जनता दरबारात दाखवली. मात्र या शेतकर्याला १९ वर्षानंतरही वीज जोडणी मिळालेली नाही ही बाबत यावेळी समोर आली. त्यामुळे अधिकाऱ्यांना या मुद्द्यावर चांगलेच धारेवर धरण्यात आले. संबंधीत कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून अभियंत्याला निलंबीत करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यामुळे या शेतकर्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. येळगाव येथील शेतकर्याच्या शेतात दोन वर्षापासून पोल पडलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात हे पोल लगोलग उभे झाले पाहिजे, अशा सुचना खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्याही समस्याही या जनता दरबारात मार्गी लावण्यात आल्या.