आषाढी एकादशीच्या दिवशी ईदची कुर्बानी न करण्याचा निर्णय
By ब्रह्मानंद जाधव | Published: June 27, 2023 04:03 PM2023-06-27T16:03:14+5:302023-06-27T16:03:37+5:30
लोणार येथील मुस्लिम बांधवांनी घडविले सामाजिक एकतेचे दर्शन
लोणार : आषाढी एकादशीला २९ जून रोजी ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय लोणार येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यासंदर्भात लोणार पोलिस स्टेशनला २७ जून रोजी पत्र देऊन लोणार येथील मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवून दिले.
२९ जूनला आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी मुस्लिम बांधवांची बकरी ईदसुद्धा साजरी होणार आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहे. हिंदू मुस्लिम बांधवांतील सामाजिक एकोपा टिकून राहावा, यासाठी लोणार शहरातील मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात मुस्लिम बांधव कुर्बानी देणार नाही, असे पत्र लोणार पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
यासंदर्भात देऊळगाव राजाच्या मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे सुनील कडासने यांनी स्वागत केले आहे. लोणार येथे झालेल्या या निर्णयाचे पत्र पोलिस स्टेशन लोणार येथे प्रभारी ठाणेदार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी इम्रान खान, रौनक अली, शेख मकसूद, शेख तोफिक कुरेशी, बिलाल शेठ कुरेशी, नजमुद्दीन काजी, बबी भाई यासह इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते.