तीन तहसीलदारांच्या अर्जांवर आज निर्णय
By admin | Published: April 2, 2016 12:49 AM2016-04-02T00:49:15+5:302016-04-02T00:49:15+5:30
अनुदान वाटप घोटाळयातील आरोपी तलाठी माकोनेचा जामीन मंजूर.
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील शासकीय अनुदान वाटपात तलाठी उज्जैनकर यांनी केलेल्या घोटाळा प्रकरणात २६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केलेल्या तत्कालीन मंडळ अधिकारी तथा तलाठी आर.पी.माकोने यांना १ एप्रिल रोजी बुलडाणा येथील सेशन कोर्टातून जामीन मिळाला आहे, तर या संबंधित तीन तहसीलदारांच्या अर्जावर युक्तीवाद होऊन त्यावर २ एप्रिल रोजी निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शासकीय अनुदान वाटपात ४२ लाख ३६ हजार रुपयाच्या अफरातफरप्रकरणी तलाठी उज्जैनकर याला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान तलाठी माकोनेचे नाव समोर आले. याबाबत पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी तलाठी माकोने यांना २६ मार्च रोजी अटक केली होती.
न्यायालयात हजर केल्यानंतर या प्रकरणात माकोनेला ३0 मार्चपर्यंत पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. मंगळवारी १ एप्रिल रोजी बुलडाणा येथील सेशन कोर्टात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणासंबंधात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी तीन तहसीलदार यांनीसुद्धा अर्ज केलेले होते. मंगळवारी तिघांच्या वकिलांकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर यावर २ एप्रिल रोजी निर्णय होणार आहे. या प्रकरणातील तलाठी उज्जैनकर व सहयोगी पुरुषोत्तम तायडे हे बुलडाणा कारागृहात असून, तीन मंडळ अधिकार्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.