रुग्णसंख्येत घट; कोविड केअर सेंटर पडले ओस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:12 AM2020-12-16T11:12:13+5:302020-12-16T11:14:10+5:30
खामगाव येथील दोन शासकीय कोविड केअर सेंटरसोबतच खासगी कोविड सेंटरही ओस पडले आहेत.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव आणि परिसरात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, खामगाव येथील कोविड केअर सेंटर ओस पडलेत. तथापि, दिवाळीनंतर घाटाखालील विविध तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होत आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयात गुरुवारपर्यंत ३४ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच, खामगाव येथे खामगाव-पिंपळगाव रस्त्यावर दोन कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. गत तीन महिन्यांपूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र म्हणून बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहराची नोंद होत होती. त्यामुळे काही खासगी कोविड केअर सेंटरचीही खामगाव येथे स्थापना झाली. दरम्यान, गत काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे खामगाव येथील दोन शासकीय कोविड केअर सेंटरसोबतच खासगी कोविड सेंटरही ओस पडले आहेत. आता मात्र खामगाव येथील उप-जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या कोविड रुग्णालयात सध्या खामगाव, जळगाव जामोद, नांदूरा परिसरातील ३४ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
२०० रुग्णांची क्षमता
खामगाव येथील शासकीय मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहात तब्बल २०० रुग्ण क्षमता असलेले कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या वसतिगृहात १५० तर मुलांच्या वसतिगृहात ५० रुग्ण क्षमता असलेले बेड सुसज्ज होते. तर शेगाव रोडवरील एका हॉटेलात आणि सूर्योदय प्रत्येकी एक असे खासगी कोविड सेंटरही खामगावात कार्यान्वित होते.
बंद करण्यासाठी वेट अॅण्ड वॉच!
दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खामगाव शहरातील शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्यासंदर्भात आरोग्य विभाग ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेत आहे.