डी.एड्. कॉलेज पडताहेत ओस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:40 AM2020-12-22T11:40:48+5:302020-12-22T11:44:46+5:30
D.Ed. College News जिल्ह्यातील आठ अध्यापक विद्यालयात शासकीय व व्यवस्थापन कोट्यातील एक जागा भरण्यात आलेली नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड्.) प्रथम वर्षाच्या ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. परंतु २०२० -२१ या शैक्षणिक वर्षाकरिता आतापर्यंत जिल्ह्यातील आठ अध्यापक विद्यालयात शासकीय व व्यवस्थापन कोट्यातील एक जागा भरण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांनी डी.एड्.कडे पाठ फिरवल्याने डी.एड्. कॉलेज ओस पडत आहेत.
बारावी झाल्यानंतर अडीच वर्षात प्राथमिक शिक्षण पदविका घेऊन शिक्षक होण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल होता. त्यामुळे जिल्ह्यात २०१० पर्यंत खैरातींप्रमाणे अध्यापक विद्यालयांना मान्यता देण्यात आली. परिणामी वर्षात लाखो विद्यार्थी डी.एड. होऊन बाहेर पडत होते. डी.एड्धारकांची संख्या झपाट्याने वाढत गेली, त्यातुलनेत शाळेवर शिक्षकांच्या जागा कमी निघत गेल्या. २०१० नंतर शिक्षक भरती बंद केली. त्यामुळे डी.एड्. होऊन बेरोजगार होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षक भरती विस्कळीत झाल्याने व डी.एड्. होऊनही शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेवर लागण्याचे स्वप्न अपूर्ण राहत असल्याने नवीन मुलांचाही डी.एड्.कडे जाण्याचा ओढा हळूहळू कमी होत गेला. सध्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाइन प्रवेशाच्या तीन फेऱ्या होऊनही अनेक जागा रिक्तच आहेत.
डी.एड्साठी विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. त्यामुळे संस्थेकडून काॅलेज बंद करण्याचा प्रस्ताव आल्यास ते विद्यालय बंद केले जाऊ शकते. आतापर्यंत मराठी माध्यमाचे ३०६ प्रवेश व उर्दू माध्यमाचे १२० प्रवेश पूर्ण झालेले आहेत.
- डाॅ. विजयकुमार शिंदे,
प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा.
२०१० नंतर शिक्षक भरतीला मोठा विलंब झाला. त्यानंतर डी.एड्. करूनही टीईटी अनिवार्य करण्यात आली. टीईटी घेतल्यानंतरही भरती लवकर होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा डी.एड्. करण्याकडे ओढा कमी झाला.
-संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष
डीटीएड स्टुडंट असोसिएशन