मृग नक्षत्र दोन दिवसांवर, पेरणीपूर्व कामे अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:11+5:302021-06-06T04:26:11+5:30
७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होते. मृग नक्षत्रात खरीप पेरणी झाली, तर येणाऱ्या उत्पादनातही चांगली वाढ होते. त्यामुळे बहुतांश ...
७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होते. मृग नक्षत्रात खरीप पेरणी झाली, तर येणाऱ्या उत्पादनातही चांगली वाढ होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा भर हा मृग नक्षत्रातील पेरणीवरच असतो; परंतु पावसाने साथ दिली तर. यंदा पाऊस लवकर येण्याची चिन्हे दिसून येत असल्याने मृग नक्षत्रात पेरणी होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून शेतकऱ्यांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. आता शेतकरी कोरोनाच्या या संकटाला बाजूला सारून पेरणीपूर्व कामांना लागले आहेत. पेरणीसाठी अत्यंत कमी दिवस उरल्याने पेरणीपूर्व कामे जोरात सुरू आहेत.
पीकनिहाय पेरणीचे नियोजन (हेक्टरमध्ये)
सोयाबीन ३,८५,०००
कपाशी १,९८,०००
तूर ७४,०००
उडीद २०,०००
मका २८,०००
ज्वारी १०,०००
पीक कर्जासाठी १५ जूनची मुदत
शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी बँकेत चकरा सुरू आहेत; परंतु अनेकांना कागदपत्रे मिळत नसल्याने पीक कर्जासाठी ताटकळत राहावे लागत आहे. खरिपाचे पीक कर्ज १५ जूनपर्यंत ८० टक्के वितरित करण्याच्या सूचना खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
१.६५ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर
मागील महिन्यात खताच्या दरवाढीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह प्रशासनाचेही खत विक्रीकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता १ लक्ष ६५ हजार १६० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.
काय म्हणतात शेतकरी...
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांना आता वेग आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
-प्रशांत कानोडजे
पेरणी जवळ आली आहे; परंतु आर्थिक टंचाईमुळे खत, बियाण्यासाठी परवड होत आहे. शेतातील पेरणीपूर्व कामे आटोपली आहेत.
-विलास खरात