अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमावर बदनामी; तिघांना अटक, मोबाईलही केले जप्त
By निलेश जोशी | Published: May 17, 2023 04:05 PM2023-05-17T16:05:01+5:302023-05-17T16:05:33+5:30
दरम्यान या तिघांविरोधात आता ३० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बुलढाणा: एका निवासी शाळेत शिकणाऱ्या मुलीचे फोटो काढून तिच्या नातेवाईकांसह समाजमाध्यमावर टाकून तिची बदनामी केल्याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी तीन जणाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून यासाठी वापरण्यात आलेले तीन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या तिघांविरोधात आता ३० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर हरिसिंग शिंगणे (वळती), संतोष हिरालाल माळी (माळवंडी) आणि शाहरुखशहा गुलजारशहा या तिघांचा समावेश आहे. एका निवासी शाळेत शिकत असलेल्या मुलीचे छायाचित्र काढून सागर आणि संतोष यानी शाहरुखशहाच्या मदतीने मोबाईलमध्ये छायाचित्रामध्ये छेडछाड केली. सोबतच समाजमाध्यमावर ते छायाचित्र टाकण्यासोबतच पीडित मुलीच्या नातेवाईकांनाही ते पाठवत अल्पवयीन मुलीची बदनामी केली. प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बुलढाणा येथील सायबर पोलिस ठाण्यात १५ मे रोजी तक्रार दिली. त्यावरून सायबर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत तिन्ही आरोपींना १६ मे रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून यासाठी वापरण्यात आलेले मोबाईलही जप्त केले आहे.
दरम्यान या आरोपींविरोधात आता ३० दिवसांच्या आत न्यायालयाद दोषारोपत्र सायबर पोलिस दाखल करणार आहेत. या प्रकरणात तिन्ही आरोपींना किमान तीन महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्यादृष्टीने सायबर पोलिसांनी पुरावे गोळा केले असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तिन्ही आरोपींविरोधात अल्पवयीन मुलीची बदनामी करण्यासह आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनीही या प्रकरणात वापरण्यात आलेेले सीमकार्डही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सारंग नवलकरा, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील सोळुंके, ज्ञानेश नागरे, पवन मखमले, विकी खरात, पंढरी सातपुते, दीपक जाधव, आनंद हिवाळे, सोएभ अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.