केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात; योगेश गवई अन् साईनाथ पवारचा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 08:14 AM2023-07-02T08:14:46+5:302023-07-02T08:16:00+5:30
योगेश गवई व साईनाथ पवार या दोन्ही तरुणांचा सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात जीव वाचला.
-योगेश पांडे
नागपूर : कंपनीतील काम संपल्यावर घराकडे जाण्यास अक्षरश: धावत-पळत बस पकडली आणि निवांत डोळा लागला. मात्र, जोरदार धक्क्याने डोळे उघडले आणि समोर साक्षात मृत्यूच उभा असलेला दिसला. खिडकी तोडून बाहेर पडण्याची तत्परता दाखविली आणि केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात देण्यात यशस्वी झाले. बस अपघाताच्या दाहकतेतून बचावल्यामुळे एकीकडे मनात समाधान असताना दुसरीकडे सोबतच्या प्रवाशांचा झालेला कोळसा अन् डोळ्यासमोर मृत्यूचे तांडव दाखविणारी ती काळरात्र मनातून कशी पुसणार हा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
योगेश गवई व साईनाथ पवार या दोन्ही तरुणांचा सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात जीव वाचला. ‘लोकमत’ने साईनाथकडून ‘आंखो देखी’ जाणून घेतली. दोघेही छत्रपती संभाजीनगर येथे कामाला आहेत. ते कंपनीच्या कामासाठीच नागपुरात आले होते. शुक्रवारी सायंकाळी बुटीबोरीतूनच ते बसमध्ये बसले. कारंजाजवळ जेवण आटोपल्यावर प्रवासी झोपले असताना सिंदखेडराजाजवळ बसमध्ये जोरदार धक्के लागले व उलथापालथ झाली. बसमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने एक खिडकी तोडली. त्याचे अनुकरण करत आम्हीही खिडकी तोडून कसेबसे बाहेर आलो. एका प्रवाशाला बाहेर काढले. मात्र, मागील बाजूस आग लागली. त्यामुळे आम्ही समोरील बाजूला जाऊन चालकासमोरील मोठी काच तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा स्फोट झाला, अशी माहिती साईनाथने दिली.
चालक, वाहक कसे पडले बाहेर?
अपघातग्रस्त बसचे चालक शेख दानिश शेख इस्माईल (वय २५, रा.दारव्हा, जि.यवतमाळ) याने बस पलटी होताच, आपल्या सुरक्षेचा मार्ग शोधला. त्याच्यासोबत बसचा वाहक संदीप मारोती राठोड (वय ३१, रा.तिवसा, जि.अमरावती) हे दोघेही चालकाच्या कॅबिनमधून कस बसे बाहेर पडले, मात्र या दोघांनीही मागील आपत्कालीन दरवाजा उघडण्यास मदत केली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
चालकाने टायर फुटल्याने अपघात झाल्याचे म्हटले आहे, परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता, पोलिसांना हे निदर्शनास आले की, बसचा टायर फुटला नसून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.