काेराेनाला हरवत जिल्हा नव्या उमेदीने भरारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:39 AM2021-08-17T04:39:33+5:302021-08-17T04:39:33+5:30

बुलडाणा : देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत ...

Defeating Kareena, the district will rise with new hope | काेराेनाला हरवत जिल्हा नव्या उमेदीने भरारी घेणार

काेराेनाला हरवत जिल्हा नव्या उमेदीने भरारी घेणार

Next

बुलडाणा : देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत नेत्रदीपक प्रगती साधली आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून जात आहोत. कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. कोरोना विषाणूला हरवित जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनीषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जि. प. उपाध्यक्ष कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज

काेराेनाची दुसरी लाट नियंत्रणात येत नाही तोच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आरोग्य संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी स्त्री रुग्णालय येथे ५० बेड्‌स, खामगाव व शेगाव येथे प्रत्येकी ५० बेड्‌स, इतर सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १५ बेड्‌स लहान बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

५९.२० मेट्रिक टन ऑक्सिजन टँकची निर्मिती

ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच पाच प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. एकूण १० प्रकल्पांमधून १० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ५९.२० मेट्रिक टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची निर्मिती करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

१.७१ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ लाख ७१ हजार १७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १ हजार १३० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा बँकेमार्फत ७७ हजार ६७० शेतकऱ्यांना ७१९.२८ कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खरेदी करणे सोयीचे बनले.

४ लाख ५५ हजार शिवभाेजन थाळींचे वितरण

कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना जिल्ह्यात विनामूल्य १७ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून जानेवारीपासून ४ लाख ५५ हजार शिवभोजन थाळी ‘पॅकिंग फूड’ स्वरूपात देण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये आतापर्यंत ४२ हजार ५११ व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५८५ किलोमीटर लांबीचे ३५० रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत.

धनादेश वितरण व सत्कार

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

राज्य शासनामार्फत शहीद जवानांच्या अवलंबितांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. त्यानुसार शहीद नायक प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या वीरपत्नी कांचन प्रदीप मांदळे यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ताम्रपत्र देण्यात आले. तसेच सेवारत सैनिक नायक विद्द्याधर दामोदर शेळके (रा. बोरगाव वसु) यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अवलंबितांच्यावतीने प्रकाश दामोधर शेळके यांना फिजिकल कॅज्युल्टी आर्थिक मदतीचा धनादेश यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते देण्यात आला.

Web Title: Defeating Kareena, the district will rise with new hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.