नांदुरा-मोताळा, चांगेफळ-माटरगाव-खामगाव रस्त्यांच्या कामात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:48 AM2020-09-15T11:48:23+5:302020-09-15T11:48:34+5:30
नांदुरा-मोताळा, चांगेफळ-माटरगाव-खामगाव या दोन्ही रस्त्यांसाठी ४५ ते ५२ दिवसांपासून दंडात्मक आकारणीला सुरूवात झाली आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घाटाखालील तालुक्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे करारनाम्यानुसार ठरलेल्या टप्प्यात पूर्ण न करणाºया कंत्राटदार सुधीर कंस्ट्रक्शन इंफ्रास्पेसला दरदिवशी ६४ हजार रुपए दंड भरण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्याखामगाव विभाग कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे. त्यानुसार नांदुरा-मोताळा, चांगेफळ-माटरगाव-खामगाव या दोन्ही रस्त्यांसाठी ४५ ते ५२ दिवसांपासून दंडात्मक आकारणीला सुरूवात झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दोन रस्त्यांची कामे करण्यासाठी सुधीर कंस्ट्रक्शन इंफ्रास्पेस या कंत्राटदाराची नियुक्ती निविदेतून झाली. त्यामध्ये चांगेफळ-खामगाव या रस्ता कामासाठी २५ आॅक्टोबर २०१९ तर नांदुरा-मोताळा या कामासाठी ३० आॅक्टोबर २०१९ रोजी कंत्राटदारासोबत बांधकाम विभागाचा करारनामा झाला आहे. करारनाम्यानुसार २४ महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. हायब्रीट अॅन्युइटी मोड (एचएएम) नुसार या रस्ता कामाच्या अटी व शर्ती ठरलेल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या किमिचे टप्पे ठरले आहेत. त्या टप्प्यांची कामे ठराविक कालावधीतच पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र, या दोन्ही रस्त्यांची कामे करारनाम्यानुसार पूर्ण न केल्याने कंत्राटदार सुधीर कंन्स्ट्रक्शन इंफ्रास्पेसला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
या कामाची देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वतंत्र अभियंत्याने सादर केलेल्या अहवालानुसार रस्ता कामाला विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.