दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातृतिर्थात; सिंदखेड राजातून आप '२०१९' बिगुल फुंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:38 PM2017-12-27T17:38:33+5:302017-12-27T17:41:43+5:30
बुलडाणा : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येथे येत असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांचा बिगुल फुंकणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे लक्ष्मण कोल्हे यांनी दिली.
पत्रकार भवनाच्या सभागृहात आज २७ डिसेंबर रोजी आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. नितिन नांदुरकर, सुनिल मोरे, अकोला निरिक्षक प्रशांत मोरे, कमांडर अलिम पटेल, वानखेडे, तालुका संयोजक विष्णु दांडगे, प्रसाद घेवंदे, इरफान शेख, ज्ञानेश्वर पाटील, मुकुंद चोपडे, संजय जैन, गजानन धांडे, भानुदास पवार, अंबादास माळी, भालेराव, अॅड. मापारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, आमच्या पक्षाने दिल्लीच्या शैक्षणिक, वैद्यकीय कामात दोनच वर्षात विलक्षण प्रगती करुन सामान्य मानसांच्या मनात जागा निर्माण केली आहे. पक्षाचे पुढील लक्ष महाराष्ट्र असून विविध अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर निवडणुका लढविण्याची आमची तयारी आहे. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेड राजात येत आहे. त्यांच्या आगमनामुळे कार्यकर्ते नव्हे तर सामान्य माणसामध्येही नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असून मॉ जिजाऊंच्या जन्मस्थळावरुन २०१९ मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीचा बिगुलही फुंकण्यात येणार असल्याचे सांगत सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले.