योजना पोहोचवा, कामांचा दर्जा सांभाळा - शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:23+5:302021-08-01T04:32:23+5:30
सिंदखेडराजा : शासकीय योजनांचा जनसामान्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासोबतच सर्व यंत्रणांनी परिसरात सुरू असलेली कामे गुणात्मक दर्जा टिकवून पूर्णत्वास नेण्यासाठी ...
सिंदखेडराजा : शासकीय योजनांचा जनसामान्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासोबतच सर्व यंत्रणांनी परिसरात सुरू असलेली कामे गुणात्मक दर्जा टिकवून पूर्णत्वास नेण्यासाठी आपसी समन्वय ठेवावा. प्रामुख्याने कामाच्या दर्जामध्ये चालढकल होणार नाही ही बाब सांभाळा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ३१ जुलै रोजी आढावा बैठकीत दिले.
स्थानिक पंचायत समिती सभागृहात सिंदखेड राजा मतदारसंघातील समन्वय समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या दलित वस्ती, रस्ता बांधकाम, तांडा सुधार, पाणीपुरवठा आदी कामे अधिकाऱ्यांनी निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील स्मशानभूमीचे वाद किंवा ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणीही यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जावा. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही आढावा घेऊन पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याच्या कारणांचा शोध घेतला जावा, असे स्पष्ट केले. राहेरी पूल, वळण रस्ता आणि मुख्य पूल नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, यादृष्टीने यंत्रणांनी कामे करावी. सिंदखेड राजा शहरामध्ये एक कोटी रुपये खर्च करून शेतकरी भवनाची इमारत उभी राहणार आहे याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.
-वनीकरण कामांची पाहणी करणार--
राज्यात २०१९ पासून ३३ कोटी वृक्ष लागवड योजना सुरू झाली आहे. तेव्हापासून सि. राजा तालुक्यात २ लाख २५ हजार वृक्षांची लागवड झाल्याची माहिती वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर अचंबित होत पालकमंत्र्यांनी हा आकडा खरा आहे का, असा प्रतिप्रश्न केला. सोबतच प्रत्यक्षात झाडे जगली आहेत का, हे पाहण्यासाठी पुढील आठवड्यात आपण व्यक्तीश: दौरा करणार आहोत. गावांची यादी करून ठेवा, अशी कडक शब्दांत सूचना दिली.