मेहकर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:33+5:302021-02-24T04:35:33+5:30
मेहकर शहरातील आठवडी बाजार, बसस्थानक आदी ठिकाणी वरली मटका, गुटखा, खुलेआम सुरू आहे. वरली मटका घेणारे लोक दिवसाढवळ्या ...
मेहकर शहरातील आठवडी बाजार, बसस्थानक आदी ठिकाणी वरली मटका, गुटखा, खुलेआम सुरू आहे. वरली मटका घेणारे लोक दिवसाढवळ्या खुर्ची टाकून वरळीच्या पट्ट्या भरतात. अवैध धंद्यामुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून, पोलीस अधीक्षक तथा मेहकरचे ठाणेदार यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ अवैध धंदे बंद करावेत, त्याचप्रमाणे मेहकर तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. मेहकर शहरामधून ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यांमध्ये अवैध दारू पुरविली जाते. हा धंदा कित्येक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. दारूबंदी अधिकारी, पोलीस विभाग व अवैध दारू पुरविणारे यांचे संगनमत असल्यानेच असा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन ग्रामीण भागात होणारी अवैध दारू विक्रीसुद्धा बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निसार अन्सारी, तालुकाध्यक्ष गजानन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील ठाकरे, प्रभाकर सपकाळ, विधानसभा अध्यक्ष पुरुषोत्तम पडघान, लक्ष्मण मंजुळकर, कैलास सावंत, कैलास जाधव, ॲडव्होकेट विजय मोरे, सद्दाम कुरेशी आदींनी केली आहे.