देऊळगावमही येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:00+5:302021-06-17T04:24:00+5:30
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देऊळगावमही येथील रस्त्याचे सन २००५मध्ये जालना ते खामगांव रोडचे चौपदरीकरण करण्यात येणार म्हणून मोजमाप करण्यात ...
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देऊळगावमही येथील रस्त्याचे सन २००५मध्ये जालना ते खामगांव रोडचे चौपदरीकरण करण्यात येणार म्हणून मोजमाप करण्यात आले होते, तसेच अतिक्रमणही हटवण्यात आले हाेते. यावेळी येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला हाेता. तेव्हापासून आजपर्यंत प्रवासी निवारा उभारण्यात आला नसल्याने परिसरातील ५० ते ५५ गावातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा, उन्हाळ्यात प्रवाशांना रस्त्यावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तत्कालीन सरपंच सविता सुभाष शिंगणे यांनी प्रवासी निवाऱ्यासाठी उपाेषण केले हाेते. तेव्हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपाेषण मागे घेण्यात आले हाेते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ८१ आर जमिनीवर ३० आर बसस्थानक, २० आर पशुवैद्यकीय दवाखाना उर्वरित ३० आरवर ग्रामपंचायतीचे काॅम्प्लेक्स करण्याचा ठराव पारित करण्यात आला हाेता. त्यानंतर या प्रस्तावावर कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे, प्रवासी निवारा अजूनही बांधण्यात आलेला नाही. याकडे तातडीने लक्ष देऊन देऊळगावमही येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी भाजप शहर अध्यक्ष कैलास राऊत यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.